लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं
समाजाचं अध:पतन उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही महाराज
सुभेदारांची सुनही आता सुरक्षित नाही महाराज
आया,बहिनी,लेका,सुना पवित्र राहिली नाही नाती
शासन करणाऱ्या तलवारींची गंजुन गेलीत पाती
आपल्या अब्रुचं लक्तरं,अब्रु झाकण्यासाठीच मागावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतंयं...
हिंदवी स्वराज्य स्थापन करुन,तुम्ही निघुन गेलात महाराज
राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग पटवुन,तुम्ही निघुन गेलात महाराज
पण या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर स्वत:ची पोळी भाजणाऱ्या
आणि आमचीच मतं घेवुन शेवटी सत्तेने माजणाऱ्या
गल्ली बोळातल्या पुढाऱ्याला "जाणता राजा" म्हणावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
इंग्रज इथे दिडशे वर्षे राज्य करुन निघुन गेले
भारतीयांचं काय पाणी,ते भारतात राहुन बघुन गेले
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर आता पाश्चिमात्य संस्कृती नाचतेय
महाराष्ट्रीयन तुतारीच्या नावाखाली इथं इंग्रजांचीच पिपाणी वाजतेय
माय मराठी मरतेय महाराज आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं जगणं झालयं मस्त
नी पोटासाठी राबणाऱ्यांचं इथं मरणं झालयं स्वस्त
किड्या-मुंगीसारखी इथं जगताहेत माणसं
वेदना असह्य होतात म्हणुन इच्छा मरण मागावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही
घरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत
स्वत: संस्कार करण्याऐवजी मुलाला पाळणाघरात देत आहेत
कुत्र आईकडं अन् पोरगं दाईकडं असललं बघावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
आता एक करा महाराज,यापुढे प्रेरणा कुणाला देऊ नका
अन् कृपा करुन तुम्ही आमच्या स्वप्नातदेखील येऊ नका
काय सांगु महाराज,आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही
नी तुमच्या आदर्शांचं ओझं इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही
कर्तव्य विसरुन आमची तरुणाई आपल्याच मस्तीत मग्न आहे
देव घरातली मुर्ती तुमची मना-मनात भग्न आहे
तुमच्या जयंतीला महाराज वर्षातुन दोन वेळा नाचावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
©गुरुराज गर्दे
0 comments: